धानोरा येथील सेंट्रल बँकेच्या शेतकरी ग्राहकांची होल्ड केलेली खाती सुरू करावीत - शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील पिक कर्ज धारक शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्याचा प्रताप येथील शाखा व्यवस्थापकाने केला आहे . त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणारे श्रावणबाळ योजनेचे पैसे व इतर अनुदान , नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना काढता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . याबाबत बन्सी शंकर मुठे रा. कुंबेफळ पो. खुटेफळ ता. आष्टी यांनी 'आपले सरकार संकेतस्थळावर तक्रार अर्ज दाखल केला होता . या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी बीड यांनी ही बाब अग्रीम बँकेच्या निदर्शनास आणून दिली . अग्रीम बँकेने अर्जाची प्रत जोडून सेन्टल बँक ऑफ इंडिया च्या धानोरा शाखेला पाठविण्यात आले आहे. तक्रार अर्जावरील नमूद मुद्यांबाबत आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून अर्जदार यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे व याबाबत अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे आदेशित केले . मात्र धानोरा येथील शाखा व्यवस्थापकाने अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरील होल्ड कायम ठेवल्याचे निदर्शनास येत आहे . या पूर्वी ही आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांची खाती होल्ड करू नये असे आवाहन केले होते .
'आपले सरकार' हा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून नागरिकांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारी जिल्हास्तरावरील संबंधित विविध प्रशासकीय कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांना निवारणासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. नोडल अधिकाऱ्यांनी या तक्रारीचे 21 दिवसात निराकरण करणे अपेक्षित असते . मात्र बन्सी मुठे व इतर शेतकऱ्यां नी दाखल केलेल्या तक्रारीवर शाखा व्यवस्थापकाने अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याने तात्काळ सर्व शेतकऱ्यांचे खाते होल्ड न करता चालू ठेवावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि प सदस्य दत्तोबा वाडेकर व सामाजिक कार्यकर्ते देविदास आप्पा गुंड सह शेतकऱ्यांनी दिला आहे . तसेच निवडणूकी पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिलेल्या सरकारने मताची भिक मागुन सत्ता मिळवली आणि आता मात्र कर्जमाफी न केल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे . याचाही निषेध शेतकरी करत आहेत . शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून तात्काळ बँक खाती चालू करावी जेणे करून शेतकरी आपल्या खात्यावरील पैसे काढून कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतील असे वाडेकर व गुंड यांनी म्हटले आहे
stay connected