संतोष आण्णा देशमुख आम्हाला माफ करा...!!

 संतोष आण्णा देशमुख आम्हाला माफ करा...!!                

----------------------------------------




संतोष आण्णा काल तुमचे ते फोटो  सगळीकडे प्रसार माध्यमातून दाखवले गेले आमच्या सारख्या स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या पांढर पेशी लोकांची ते फोटो पाहण्याची हिंमतचं होत नव्हती,  आमची तर ते फोटो पाहण्याची हिंमत होत नाही तुम्ही तर ते अमानुष कृत्य कसं सहन केले असेल ? तुमच्या बरोबर झालेल्या त्या कृत्याची नुसती वर्णनेच मनात भीतीची कंपणे निर्माण करतात, कुठल्याही संवेदनशील माणसांत ज्याला हृदय आहे व त्यात भावना आहेत त्या सर्वांच्या डोळ्यात काल अश्रू आल्याशिवाय राहिले नसतील.

काल खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून षंढ ठरलो आहोत आपली सर्वांचीच ती हतबल, भेकड अगतिक अवस्था सगळ्यांना लज्जित करत आहे. संतोष आण्णा खरोखरच आपण माणसं आहोत का? असा प्रश्न आज मला तुम्हालाच विचारावा वाटत आहे. आम्ही सर्वसामान्य फक्त जिवंत आहोत आणि तितकेच असहाय आहोत खरंच संतोष आण्णा  शक्य असेल तर आम्हाला माफ करा.

tejwarta


  तुमच्या बरोबर त्या नराधमांनी क्रूर पणाची परिसिमा गाठली क्षणभर त्या जागी आम्ही स्वतःला ठेवून पाहिलं तर  भयभयित होऊन प्रचंड अस्वस्थ झाले आहोत. आण्णा तुमचा मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवाची लाहीलाही होत असताना ती पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण,मृत्यूच सुटका करील यातून अशी तुमची अगतिक मन:स्थिती आणि अखेरच्या क्षणी तुमच्या डोळ्यात पत्नी, मुले , आई,भाऊ, गावकरी यांचे चेहरे समोर आले असतील तुमच्या डोळ्यात अश्रू येत असताना समोर निर्लज्ज हसणारे हैवान तुम्हाला दिसत असतील आणि शेवटी तुमचे डोळे मिटल्यानंतर फक्त दिसला असेल अंधार तो जगण्याचा आणि स्वतःच्या मरण्याचाही...

 तुमच्या भीषण, अमानुष, क्रूर हत्येचे फोटो वन्य मुक्या प्राण्यांनी पाहिले असतें तर त्यांनाही लाज वाटली असती. काही माणसातही वन्य प्राणी वृत्ती असते पण ते सुद्धा इतके क्रूर वागत नाहीत कुठलेच वन्य प्राणी आपल्या स्वतःच्या जातीच्या प्राण्याला मारत नाहीत आणि ही माणसातील सैतानी वृत्तीचे माणसं आपल्यात आज उथळ मानाने अनेक गुन्हे करून फिरत असताना आम्ही समाज म्हणून फक्त उघड्या डोळ्याने पाहत होतोत आणि या सैतानी जनावरांना लपायला जागा देणारे,त्यांच्या कुठल्याही अनैतिक कृत्या मागे ठाम उभा राहणारे राजकीय पुढारी हेच यांचे खरे पालन कर्ते आहेत हे मात्र निश्चित आहे.

तुमच्या कुटुंबियांच्या अश्रूंनी या सत्तेच्या , स्वार्थाच्या भिंती उभ्या करणाऱ्या नेत्यांवर साधा ओरखडा ही उमटला नाही.

संतोष आण्णा तुमचा मृत्यू आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा बुरखा फाडणारा ठरला आहे.नराधमानी तुमच्या तोंडावर लघुशंका केली नाही तर त्यांनी स्वतंत्र भारताच्या सामाजिक व्यवस्थेवर आपले मूत्र शिंपडले आहे.  छत्रपती संभाजी महाराजांनंतर इतकी क्रूर हत्या महाराष्ट्राने आज पहिल्यांदा पाहिली आणि आपले सर्वांचे दुर्दैव असें ती ही बीड ज़िल्ह्यात झाली या तुमच्या हत्येने आण्णा आपल्या बीडची बदनामी देशभरात झाली व ज्या नराधम व्यक्ती मुळे झाली त्यांचे पाठीराखे मात्र आजही निर्लज्ज पणे त्याचे समर्थन करताना दिसत आहेत यापेक्षा बीड ज़िल्हाचे दुसरं दुर्दैव काय असू शकते. या तुमच्या मृत्यूने किमान थोडी तरी लाज ही इथल्या राजकीय व्यवस्थेला कशी वाटली नाही. मग दगडांच्या देशा हे महाराष्ट्राचे वर्णन आमच्या पाषाणहृदयी,कोडगेपणाला उद्देशून म्हटले 

होते का ? असा प्रश्न आजचा एकूण राजकीय व्यवहार पाहून पडल्या शिवाय राहत नाही.

जनतेचा आक्रोश सत्तेचा माज कसा लाथाडतो, कसा टोलवाटोलवी करतो सांडलेले लाल रक्त, लाल दिव्याला 

किंचितही कसे विचलित करत नाही हे सर्व तुमच्या मृत्युच्या तीन महिन्या नंतर ही उभा महाराष्ट्र पाहत आहे.



खरंतर भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा हा की कोणत्याही विषयावर ओरडता येते आणि तोटा हा की त्या ओरडण्याचा काहीही उपयोग होत नाही असं या प्रकरणात म्हणल तरी ते वावग होणार नाही.

    मागे  मंत्री पंकजाताई मुंडे यांचा व्हिडिओ फिरला. त्या म्हणतात की ' 'धनंजय मुंडे यांचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही ते वाल्मीक कराड '...आणि समोरची गर्दी टाळ्यांचा कडकडाट करते,इतका मोठा पुरावा जनतेच्या न्यायालयात  बहिणीने दिल्यावर खरे तर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला तीन महिने का लागले हा महाराष्ट्राच्या मनात पडणारा प्रश्न आहे, याचे उत्तर कधी मिळणार आहे.

 त्या क्रूर आणि उलट्या काळजाच्या आरोपीना जो व्यक्ती पाठीशी घालतो त्याला शिक्षा फक्त तो मंत्री कार्यालयात न येणे इतकेच ? 

बीड जिल्ह्याची धर्मसत्ता, तिथली जातसंस्था,राज्याची राजसत्ता यांच्या मागे उभे राहते. ज्याच्या मांडीला मांडी लावून आपण बसतो त्याबद्दल इतर मंत्रिमंडळ सदस्यांना काही वाटत नाही.

यावरून सत्तेचे हे ठेकेदार किती मतांची गणिती आणि राजकीय खेळी खेळण्यात रमले आहेत ? संवेदना नावाची गोष्ट किती लांब आहे यांच्या पासून हे सिद्ध होते.



           सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी सामान्य माणसांना आदर्श घालून द्यायचा असतो परंतु असल्या गुन्हेगार पोसणाऱ्या पुढऱ्यांना तुरुंगात टाकणे दूरच पण केवळ राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस संपूर्ण जनता, प्रसार माध्यमाना, सत्ता व विरोधी पक्ष्यातील आमदारांना संघर्ष करावा लागला तेव्हा फक्त यांना पदावरून दूर केले जाते.काल अंजली दमानिया यांचे अश्रू या हतबल संघर्षाचे प्रतीक होते.अंजली दमानिया यांचे अश्रू  कोणीच या उजळमाथ्याने वावरणाऱ्या गुन्हेगार रक्षक व्यक्तीला हात लावू शकत नाही ही हतबलता सांगत होते. ती अगतिकता आज गावागावात लोक अनुभवत आहेत याचा विचार कधी होणार आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात कायद्याचा धाक कधी बसणार आहे. राजकीय नेत्यांच्या मार्जितले कायद्याचे, जनतेचे रक्षक उघड उघड गुन्हेगारी प्रवृत्ती च्या मागे उभे राहत आहेत याला अराजकता नाहीतर दुसरं काय म्हणायचे याच उत्तर राजकीय व्यवस्था देईल का?

हे प्रकरण प्रसार माध्यमांनी,देशमुख कुटुंब,मस्साजोग ग्रामस्थानी,मनोज दादा जरंगे  पाटील, आ. सुरेश धस आण्णा यांनी तर नेटाने शासन दरबारी मुख्यमंत्री यांच्या कडे लावून धरले, त्याकामी त्यांना खा. बजरंज बाप्पा सोनवणे, खा. सुप्रिया सुळे,आ. संदीप क्षीरसागर, आ. जितेंद्र आव्हाड यांची मोठी साथ मिळाली  अन्यथा हे प्रकरण अन्य प्रकरणासारखे 

असेच दडपले गेले असते.



हा सर्व प्रकार बघून वाटते की तुमचे खरेच चुकले संतोष आण्णा तुम्ही उगाच जीव पणाला लावला. त्या दोन कोटी खंडणी त वाटा मागायला हवा होता. जीव वाचला असता आणि त्या पैशाच्या जोरावर सगळे करतात तसें राजकारण तुम्ही करायला हवे होते. असल्या उलट्या काळजाच्या राजकारणात का जीव पणाला लावला तुम्ही हेच कळत नाही. पंधरा वर्षे गावचे सरपंच राहून तुम्हाला तुमचे साधे घर सुद्धा तुम्हाला बांधता आले नाही. तुमच्या आदर्श वागणुकीचे हेच फळ तुम्हाला मिळणार होते का? आजच्या पूर्णपणे नैतिकता  ढासळलेल्या समाजात चांगल्या माणसाने  समाजहीताची चांगली काम करायचे का नाहीत? संतोष आण्णा तुमच्या अश्या मृत्यूने सगळा महाराष्ट्र हळहळला, निशब्द झाला आहे या आरोपीना व त्यांच्यातील या वृत्तीना कठोरातली कठोर शिक्षा झाल्या शिवाय तुमच्या रक्ताने लाल झालेली ही माती महाराष्ट्र धर्माला माफ करणार नाही हे मात्र निश्चित आहे.                               

लेखक -                                                                                                            
 प्रा. महेश कुंडलिक चौरे,                  
आष्टी.                                        
मो. 9423471324



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.