हंगामी बस सुरू करण्यासाठी 'आगार बंद' आंदोलन आष्टी आगाराचा गलथान कारभार

 हंगामी बस सुरू करण्यासाठी 'आगार बंद' आंदोलन
आष्टी आगाराचा गलथान कारभार 




आष्टी प्रतिनिधी- पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा आष्टी तालुका नेहमीच चर्चेत असतो. फायद्याचा असणारा आष्टी आगार हा मागील दोन वर्षांपासून आगार प्रमुखाच्या मनमानीमुळे व नियोजनाअभावी तोट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. बस असून सुद्धा अनेक गावांना बसच नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. नवीन बस सुरू करण्यासाठी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, प्रवासी संघटना, व्यापारी असोसिशन, पत्रकार संघ यांनी लेखी निवेदन देऊन ही आगार प्रमुख काहीच कारवाई करत नसल्याने लवकरच 'आगार बंद' आंदोलन करणार असल्याचे निवेदन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन विभाग बीड यांना देण्यात आले आहे.

आष्टी आगार नेहमीच विविध कारणाने चर्चेत असतो.  प्रवाशांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने प्रवासी संघटनेने आष्टी - मुंबई, आष्टी - स्वारगेट - पुणे - मुंबई, आष्टी - बारामती - सातारा, आष्टी - सातारा (मुक्कामी), आष्टी - बारामती (मुक्कामी), आष्टी - स्वारगेट (मुक्कामी), आष्टी - पाथर्डी - शेवगाव या जादा हंगामी बस सुरू करण्यासाठी आष्टी आगार तसेच विभाग नियंत्रक बीड यांना बुधवार दि. २६ मार्च २०२५ रोजी निवेदन दिले आहे. तरीही सदरील निवेदनाची अद्याप पर्यंत दखल घेतली गेली नाही. हंगामी जादा बस लवकरात लवकर सुरू न केल्यास शुक्रवार दि. ३ एप्रील २०२५ रोजी 'आगार बंद' आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, प्रवासी संघटना, व्यापारी संघटना, पत्रकार संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.