अनिषा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने आष्टीकरांची मने जिंकली
महाभारत,शेतकरी व्यथा,शिव तांडव,सोशल मिडियाचे सादरीकरण ठरले लक्षवेधी.
आष्टी (प्रतिनिधी) महाभारतातील श्रीकृष्ण जन्म, द्रौपदीचे वस्त्रहरण,युद्धभूमीवरील सादरीकरण तसेच सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या,सोशल मिडीयाचा होणारा अती वापर आणि त्यातून विद्यार्थ्यांची बदलत चाललेली मानसिकता यासह विविध नृत्य, संगीत, नाटक आणि इतर कला प्रकार सादर करत आष्टी शहरातील अनिषा ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आष्टीकरांची मने जिंकली.
शहरातील पिंपळेश्वर देवस्थान संचलित अनिशा ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,संचालक ह.भ.प.रामदास डोरले महाराज,सुखलाल मुथा,प्रा.लक्ष्मण रेडेकर,संजय मुळे, सौ. प्राजक्ता धस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावत चाललेली माणसे त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत जाणारी तरुणाई यावर प्रकाश टाकत सामाजिक संदेश देत कुटुंबातील वाढत असलेला विसंवाद याला सोशल मीडिया कशा पद्धतीने कारणीभूत आहे,हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाटीकेतून सादर केले. तर सद्यस्थितीत शेतमालाला मिळणारा बाजार भाव,अवकाळी,गारपीट यासह अन्य कारणांनी पिकांचे होणारे नुकसान त्यामुळे कर्जबाजारी होत चाललेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.
शिव तांडव नृत्याने,तर चिमुकल्यांच्या नव नवीन कला आणि संस्कृतींचा परिचय करून देत त्यांच्यातील कलात्मक क्षमतांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
stay connected